सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढणार, वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीसाठी उमेदवार जाहीर

टीम महाराष्ट्र देशा- वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याचा धडाका सुरूच आहे. दबावतंत्राचा वापर करत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातल्या सभेत पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर केले आहेत. आंबेडकरांनी बारामतीसाठी उमेदवार जाहीर करत थेट राष्ट्रवादीला आणि खा.शरद पवारांना चॅलेंज केलं आहे.

बहुजन वंचित आघाडीकडून बारामतीसाठी नवनाथ विष्णू पडळकर, पुण्यासाठी विठ्ठल लक्ष्मण सातव असे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भारिपला एमआयएमचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भारिपने स्वबळावर सर्व ठिकाणी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीसाठी उमेदवार जाहीर केल्याने खा.सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.

याशिवाय साताऱ्यासाठी सहदेव ऐवळे, माढ्यासाठी विजय मोरे, सांगलीसाठी जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या उमेदवारीची देखील आंबेडकरांनी घोषणा केली आहे. दरम्यान,काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर चांगलीच सडकून टीका केली होती. ‘शरद पवार हे पुरोगामी तर त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी हा पक्ष संभाजी भिडे चालवतात असा आरोप त्यांनी केला होता..