fbpx

मंत्र्यांची अवस्था सालगड्यासारखी – दीपक साळूंखे-पाटील

सोलापूर  – केंद्रात आणि राज्यातही कधी नव्हे अशी हुकुमशाहीची परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकटेच निर्णय घेत आहेत. बाकी राज्य आणि केंद्रांतील मंत्र्यांची अवस्था सालगड्यासारखी झाली आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळूंखे-पाटील यांनी येथे बोलताना केली.

यावेळी पुढे बोलताना साळूंखे-पाटील म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, नोकरदार कोणताही वर्ग समाधानी नाही. जी.एस.टी. नोटबंदी, रेरा कायद्याने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी मोडून पडला आहे. मंत्रालयात जाऊन विष पिण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. त्यामुळे हे सरकार सर्वच पातळ्यावर अपयशी ठरले असल्याचीही टीका साळूंखे-पाटील यांनी केली.

जिल्ह्यातील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येत असल्याची चर्चा सुरू आहे यासंदर्भात विचारणा केली असता साळूंखे-पाटील म्हणाले, यासंदर्भात मला काही माहिती नाही वरिष्ठ पातळीवर काही गोष्टी झाल्या असतील तर स्थानिक कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्ष प्रवेशासाठी एन.ओ.सी. दिली जाणार नाही. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, पंढरपूर विकास प्राधीकरण, पालखी तळ विकास कामांची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात येणार आहे. शेतक-यांवर अन्याय होत असले तर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल असाही इशारा पाटील यांनी यावेळी दिला.