दीपक मानकर यांना धक्का, अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

पुणे- कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.  दरम्यान जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात दिपक मानकर यांचे साथीदार विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार, विशांत कांबळे या पाच जणांना समर्थ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला झाल्यापासून मानकर गायब आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय. काल पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना ते भेटले नाहीत. मानकर यांचा फोनही आऊट ऑफ कव्हरेज येत आहे.अश्या परिस्थितीत न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मानकर यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मानकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय दीपक मानकर हे राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर मानकर याचं नाव होतं. जून अखेरपर्यंत अजित पवार हे नव्या शहर अध्यक्षाची घोषणा करणार होते. आता या प्रकरणामुळे मानकर याना संधी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. पुण्याच्या राजकारणात बडे प्रस्थ असणारे दीपक मानकर यांची आजवरची कारकीर्द अनेकवेळा वादात सापडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

जितेंद्र जगताप यांच्या ताब्यात रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेली 481 रास्ता पेठ येथील जमीन आहे. या जमीनीबाबत दिपक मानकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार सुधीर कर्नाटकी यांच्या ताब्यात असलेल्या व देखभाल करत असलेल्या या जमीनीबाबत मागील दहा ते बारा वर्षांपासून व्यवहार सुरु आहेत. दरम्यान या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून जगताप यांच्यासोबत मानकर व कर्नाटकी यांच्यात दोन तीन वेळा बैठक झाली. त्यांना ही जागा ताब्यात देण्यासाठी व कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या जमीनीच्या देखभालीसंदर्भात आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा व देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास आपण या कागदपत्रांवर सह्या करू असे जगताप यांनी सांगितले होते.

त्यानंतर शुुक्रवारी जगताप यांनी जयेश जगताप यांना या बैठकांतील सर्व हकिकत सांगितली. तसेच या जागेचा ताबा तू भविष्यात दिला नाही तर कागदांवर सह्या करून कसा ताबा घ्यायचा आहे हे मला माहित आहे. यात माझा लौकीक आहे. तू घरी जाऊन विचार कर असे धमकावले. त्यानंतर शनिवारी सकाळी जगताप नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्ता पेठेतील या जागेवर गेल्यावर तेथे विनोद भोळे व इतर सहा ते सात जण तेथे आले. त्यांच्यात तेथे बोलणे झाले. त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत बाहेर आले. काही कामानिमित्त ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी घोरपडी येथे आत्महत्या केली. त्यांच्यासोबत गेलेल्या रिक्षाचालकाजवळ त्यांनी लखोटा दिला होता. तो पाहिला त्यावेळी त्यात दिपक मानकर व सुधीर कर्नाटकी व फोटीतील व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले होते. असे फिर्यादीत म्हटले आहे.