पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास विकासकामांवर परिणाम होईल: नितीन गडकरी

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आर्थिक स्थितीमुळे अपरिहार्य! त्याचा थेट जागतिक अर्थशास्त्राशी संबंध आहे.

नवी दिल्ली: सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३० तर डिझेलचा दर लीटरमागे २० पैशांनी वाढला आहे. मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर ८५.२९ इतके झाले आहेत. तर अमरावती शहरातल्या पेट्रोलचा दर हा संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. अमरावतीत पेट्रोलचा दर लिटरमागे ८६.४४ तर डिझेलचा दर ७४.११ इतका आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीचं समर्थन केलं आहे. “इंधनांच्या किमंती कमी केल्यास त्याचा विकास कामांवर परिणाम होईल. डीझेलचे दर कमी केल्यास जलसिंचनाची कामे, उज्वला योजना, ग्रामीण भागात वीज पोहोचविण्याची कामे तसेच मुद्रा योजनेवर त्याचा मोठा परिणाम होईल. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आर्थिक स्थितीमुळे अपरिहार्य आहे. त्याचा थेट जागतिक अर्थशास्त्राशी सबंध आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील. तर आंतरराष्ट्रीय बाजारातून तेल चढ्या दराने घेऊन इथे ते स्वतात द्यावे लागेल. आणि असे केले तर जनहिताच्या अनेक योजनांवर परिणाम होईल”, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.