गुणवत्तेच्या निकषावरच शाळा बंद करण्याचा निर्णय – सुनील मगर

fundamental right of children

रत्नागिरी : राज्यातील शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय केवळ गुणवत्तेचा विचार करून घेतलेला आहे. कोकणातील कडेकपारी असलेल्या शाळा बंद करून समाज व्यवस्थेतील शिक्षण प्रक्रियेवर कु-हाड घालणे हा शासनाचा मुळीच हेतू नाही, असे मत पुण्याच्या विद्या प्राधिकरणाचे शिक्षण संचालक सुनील मगर यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले शिक्षण संचालक मगर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते.

शाळा बंद करून शिक्षण व सामाजिकीकरणात शासनाला दरी निर्माण करायची नाही. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद केल्या जात आहेत, हे म्हणणे चुकीचे असून शासनाच्या जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन वेगळाच आहे. पालकांना वाटते की खासगी शाळामध्ये चांगले शिक्षण दिले जाते आणि शासनाच्या शाळांमध्ये गुणवत्ता घसरण होते. पालकांच्या या दृष्टीकोनामुळे पटसंख्येवर परिणाम होत असल्याने शाळा बंद होऊ लागल्या आहेत. मुख्य म्हणजे कमी गुणवत्ता असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळाबंदीचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसत असून रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६० शाळा बंद केल्या आहेत.

या शाळा केवळ कमी पटसंख्या झाल्यामुळे बंद करण्यात आल्या असल्याचे संचालकांना सांगताच त्यांनी शाळा बंद करण्याबाबत अफवा पसरविल्या जात असून गुणवत्ता हा निकष लावून शाळा बंद केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना अतिरिक्त कामाचा बोजा वाढलेला आहे. याबाबत बोलताना मगर म्हणाले काही कामे राष्ट्रीय कर्तव्यात येतात. जनगणना, मतदार नोंदणीसारखी कामे पूर्वीपासून शिक्षक करतच आहेत. सरल प्रक्रियेमध्ये ऑनलाईनची कामे वाढलेली आहेत. शासनाने बनवलेले सरल पोर्टल पूर्णतः निष्क्रिय झाले आहे. वेळखाऊ आणि शाळाबाह्य कामे करावी लागत असल्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होण्यामागे शासनच जबाबदार आहे. खासगी शाळामध्ये शिक्षक सात तास शिकवितात.

मात्र शासनाच्या शाळेमध्ये अनावश्यक आणि शाळाबाह्य कामांमध्ये शिक्षकाला विनाकारण ओवले जाते. त्याचा अध्ययन अध्यापनावर परिणाम होत असल्याचे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे. त्याबाबत विचारले असता मगर म्हणाले की, सरल प्रणालीबाबत अनेक गुणदोष आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या बरोबर आपण चर्चा करणार असून योग्य तो निर्णय घेतला जाईल