सोलापूर शहरातील शर्तभंग केलेल्या सोसायटींबाबत लवकरच निर्णय

सोलापूर : राज्यशासनाने सेंट जोसेफ प्रशाला जमीन दिल्याप्रकरणी महसूलमंत्री यांच्या आदेशानुसार संस्थेचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. याबाबत संस्थेस कागदपत्रे जमा करण्याची नोटीस बजावली आहे तर लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या जागेप्रकरणी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सेंट जोसेफ प्रशाला लक्ष्मी-विष्णू गिरणीबाबत लवकरच सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.शासनाने दिलेल्या जमिनीची जिल्हाधिकारी यांची परवानगी घेता परस्पर विक्री वापरात बदल केल्याप्रकरणी शहरातील ६३ गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा दिल्या आहेत. या शर्तभंग केलेल्या सोसायटींबाबत मागील आठवड्यात बैठकही घेण्यात आली. या सोसायटी चेअरमन, सभासदांना याची अधिक माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून शासन आदेशानुसार जे शुल्क असेल त्याप्रमाणे सोसायटींवर कार्यवाही करण्यात येणार असल्यासचे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले.

मुंडे यांनी केली होती कारवाई
शहरातील शर्तभंग केलेल्या सोसायटी सभासदांना तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी नोटिसा दिल्या होत्या. जे सभासद यामध्ये दोषी ठरतील, त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आदेशही दिले होते. यातील काही सोसायट्यांनी जिल्हा न्यायालयात स्थगिती घेतली तर काही सोसायट्यांनी महसूलमंत्री यांच्याकडून स्थगितली आणली होती. यामुळे सोसायटी सदस्यांवरील कारवाईला ब्रेक लागला. त्यानंतर आता जिल्हाधिकारी भोसले यांनी शर्तभंग प्रकरणी सोसायट्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता कारवाई केली जाणार आहे.