पहिल्याच कॅबिनेट बैठकीत देणार सरसकट कर्जमाफी – जयंत पाटील

गेवराई : सत्ताकाळात युती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व तरुणांना रोजगार न देता फक्त भूलथापा देऊन फसविले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. राज्यात आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन देत त्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ येथे कृष्णाई निवासस्थानी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. माजी मंत्री शिवाजीराव पंडित, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अनिल तुरूकमारे, शेतकरी संघटनेचे श्रीनिवास भोसले, विजयसिंह पंडित उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, भाजप-सेनेची आता उलटी गिनती सुरू आहे. प्रमुख नेते व मंत्र्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. या सरकारची खोटी नियत राज्यातील तरुणांना समजल्याने तरुणांचा ओढा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. हेच तरुण विजयसिंह पंडित यांच्या विजयाचे शिलेदार बनतील, असा आशावाद आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी अमोल मिटकरी, अनिल तुरूकमारे यांचेही भाषण झाले.

महत्वाच्या बातम्या