महाराष्ट्रात मुद्रा योजनेचे ५७ हजार कोटींचे कर्ज वितरण…

१ कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर; तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जुलै २०१८ अखेर ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून आतापर्यंत १ कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, तर तरुण कर्ज प्रकारात सर्वाधिक १६ हजार ५२९ कोटींचे कर्ज वितरित करून महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले आहे.

देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

देशात ६ लाख कोटींहून अधिक कर्ज वितरण

मुद्रा योजनेअंतर्गत एप्रिल २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी ३७ लाख ८५ हजार कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून ६ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आले असून जुलैअखेर ६ लाख १० हजार कोटींचे कर्ज प्रत्यक्ष वितरित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात १ कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर

महाराष्ट्रात एप्रिल २०१५ ते जुलै २०१८ अखेर मुद्रा योजनेची १ कोटी १४ लाख ४७ हजार २३७ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या कर्ज प्रकारणांसाठी आतापर्यंत ५९ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून प्रत्यक्षात ५७ हजार ४४३ कोटीचे कर्ज वितरण जुलै २०१८ अखेरपर्यंत करण्यात आले आहे.

तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र अव्वल; १६ हजार कोटींचे कर्ज वितरण

असंघटित लघु उद्योगांना तरुण कर्ज प्रकारात ५ ते १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. महाराष्ट्रात या कर्ज प्रकारात गेल्या तीन वर्षात २ लाख २५ हजार २२३ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यासाठी १७ हजार ११९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याचबरोबर जुलैअखेर १६ हजार ५२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

शिशु कर्ज प्रकारात १ कोटीहून अधिक प्रकरणे मंजूर

शिशु कर्ज प्रकारात ५० हजारापर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्रात या कर्ज प्रकारात आजपर्यंत १ कोटी ४१ लाख ८ हजार प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. जुलैअखेर या कर्ज प्रकारात २४ हजार १६८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे,तर प्रत्यक्षात २३ हजार ७८२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

किशोर कर्ज गटात १७ हजार कोटींचे कर्ज वितरण

किशोर कर्ज गटात ५० हजार ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. महाराष्ट्रात एप्रिल २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत ८ लाख ३ हजार ९५० कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून या कर्ज प्रकरणांसाठी १७ हजार ७४१ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे, तर जुलै अखेरपर्यंत १७ हजार १३० कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत.

गेल्या ७ महिन्यात १४ हजार कोटींचे कर्ज वितरण

मुद्रा योजनेत महाराष्ट्रात जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्याच्या कालावधीत १४ हजार ५८२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. तरुण कर्ज प्रकारात गेल्या सात महिन्यात ४ हजार ३५३ कोटी, किशोर कर्ज गटात ५ हजार १७४ कोटी आणि शिशु कर्ज गटात गेल्या सात महिन्यात ५ हजार ५५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. देशात ५० हजारहून अधिक कर्ज वितरण करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू, उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

You might also like
Comments
Loading...