fbpx

लोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा

Death Sentenced to 3 in Loni Mawala Case

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याच्या प्रकरणी तीनही आरोपींना अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा सुनावली.संतोष लोणकर (वय 36), मंगेश लोणकर (वय 30) व दत्तात्रय शिंदे (वय 27, तिघे राहाणार लोणी मावळा, तालुका पारनेर)अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी मावळा येथील संबंधित मुलगी अळकुटी येथील शाळेत 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत होती.ती जवळच वाडीवर राहात असल्याने शाळेत ही मुलगी पायीच ये-जा करीत असे.22 ऑगस्ट 2014 रोजी सदरची पिडीत मुलगी नेहमीप्रमाणेच सकाळी साडेनऊ वाजता आपल्या शाळेत गेली.शाळेत चाचणी परीक्षा असल्याने ही मुलगी अळकुटी येथून एसटी बसने सायंकाळी 5 वाजता लोणी मावळा येथील बस स्टँडवर पोहोचली. पाऊस सुरू झाल्याने एका झाडाखाली ती थांबली होती.त्यावेळी एका ग्रामस्थाने तिला तेथे थांबलेले पाहिले होते.

दरम्यान तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपींनी या मुलीला जबरदस्तीने पकडून जवळच असलेल्या चारीच्या पुलाखाली नेऊन तिच्यावर क्रूरपणे सामुहिक बलात्कार केला.तिघा आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिच्या तोंडात चिखल कोंबून तसेच स्क्रू ड्रायव्हरने चेहे-यावर मारहाण करून तिचा अतिशय निर्घृणपणे खून केला.दरम्यान सायंकाळी उशीरा पिडीत मुलगी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला.

त्यावेळी रात्री 7 च्या सुमारास पिंपळगाव जोगा कॅनॉलच्या चारीच्या छोट्या पुलाखाली सदर मुलीचा मृतदेह सापडला.या घटनेमुळे गावासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शालेय मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेनंतर परिसरात भितीचे व दहशतीचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे परिसरातील मुलींच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठविणे बंद केले होते.

या घटनेमुळे पोलीसांसमोर देखील तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम,अतिरिक्त पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे व पोलीस उप अधिक्षक यादवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शरद जांभळे व अन्य पोलीसांनी अतिशय शीघ्र गतीने तपास करीत घटनेच्या दुस-या च दिवशी म्हणजे 23 ऑगस्टला आरोपी संतोष लोणकर याला अटक केली. 24 ऑगस्ट ला मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे या उर्वरित दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व लोणी मावळा ग्रामस्थांच्या मागणीनुसार या प्रकरणी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी काम पाहिले.1 जुलै 2015 पासून सुरू झालेली खटल्याची सुनावणी 7 जुलै 2017 रोजी पूर्ण झाली.पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करतांना 55 जणांच्या साक्षी नोंदविल्या होत्या.

सुनावणी दरम्यान एकूण 36 साक्षीदार तपासण्यात आले.6 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी असल्याचे जाहीर केले.त्यानंतर मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश केवले यांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.तसेच कट करणे व सामुहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे