मुस्तफा डोसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुस्तफा डोसा १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आरोपी

मुंबई – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.  काल रात्री अचानक छातीत  दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील पोलीस बंदोबस्तात  वाढ करण्यात आली होती. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

जे जे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोसाला हाय ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचाही त्रास होता. डोसानं हृदयरोगासंदर्भात विशेष न्यायालयालाही सूचना देऊन बायपास सर्जरी करण्याची परवानगी मागितली होती. 

१९९३ च्या बॉम्बस्फोटाचा दुबईत कट रचणे, कटासाठी माणसांची जुळवा जुळव करुन त्यांना ट्रेनिंगकरता पाकिस्तानात पाठवणे, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खुन, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे मुस्तफा डोसावर दाखल होते.

नक्की कोण होता मुस्तफा डोसा

  • मुस्तफा डोसा हा 1993 च्या साखळी स्फोटातील महत्त्वाचा आरोपी.
  • दाऊद आणि टायगर मेमन यांना स्फोट घडवण्यासाठी मदत
  • मुंबई स्फोट घडवण्यासाठी ज्या बैठका झाल्या, त्या डोसानेच आयोजित केल्या होत्या.
  • डोसाने शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी भारतातून काही जणांना पाकिस्तानात पाठवलं होतं.
  • डोसानेच एके-47,एके-56 रायफल्स आणि स्फोटकांचा पहिला साठा रायगड जवळच्या दिघीबंदरात पाठवला होता.
  • डोसाला सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने 1995 साली दिलेल्या जबाबावरून या स्फोटाचा आरोपी बनवण्यात आलं.
  • त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 मार्च 2003 साली अटक करण्यात आली होती.