मरण स्वस्त तर जगणं महाग झालं….

अमोल हिप्परगे : कोरोना या जागतिक महामारीने जगभर थैमान घातले आहे. यातून आपला देश आणि राज्यही मागे राहिले नाही. इतर क्षेत्राप्रमाणे शेतकरी वर्गाला देखील याचा मोठा फटका बसणार असल्याची सध्या चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

‘माणसाने किड्यामुंग्यांसारखं जगू नये’ हे आपण अनेकदा ऐकलंय, पण आज जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कानावर पडला की वाटतं किड्यामुंग्यापेक्षा माणसाची अवस्था वाईट झाली आहे. या संकटाने जीवनचक्र तर बिघडवलच पण अर्थचक्रही पूर्णपणे थांबवलं आहे. शेतकरी हवालदील तर युवक बेरोजगार आणि हतबल झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील द्राक्षे बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

जीवापाड जपलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळतोय पण काय करणार द्राक्षे हे नाशवंत असल्यामुळे काही कालावधीनंतर ते खराब होण्यास सुरुवात होते त्यामुळे शेतकर्यांसमोर पर्याय उरत नाही, द्राक्षांना प्रतिकिलो 15 ते 20 रुपये भाव सध्या व्यापारी देत आहेत. त्यामुळे यंदा बऱ्याच द्राक्षेबागायतदार शेतकऱ्यांनी बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. फवारणीसाठी लागणारा खर्च, मजुरांचा खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. कलिंगड, खरबूज उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांची सुद्धा तीच अवस्था पाहायला मिळते आहे. पण एवढा तोटा सहन करूनसुद्धा शेतकरी हा आज सामंजस्याची भूमिका घेताना दिसतोय. हे संकट फक्त आपल्या एकट्यावर नाही हे संकट पूर्ण जगावर आलं आहे असं म्हणून तो आपल्या शेतातील फळं,भाज्या गरीब लोकांना त्यासोबतच इतर शेतकऱ्यांना वाटतोय.

शेतीपूरक व्यवसाय असेल, कच्च्यामालाचे पक्क्या मालात रूपांतर करणारा प्रक्रियाउद्योग असेल, दुकाने अशा लघुउद्योगांना या संकटाने डबघाईला आणले आहे, कमी भांडवलावर व्यवसायात उतरलेल्या तरुणांवर आज उपासमारीची वेळ आणली आहे. एवढे असून सुद्धा प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा समाजभान राखून वागतो आहे हे महत्त्वाचं…

हे संकट काही काळाने आटोक्यात येईल पण थांबलेलं अर्थचक्र कसं रुळावर आणायचं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात अनेक तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत, लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यांच्याही परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, त्या उमेदवारांच्या सुद्धा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे…

काही राष्ट्रांमध्ये लोक लॉकडाउन विरोधात रस्त्यावर येऊन सरकारविरोधी निदर्शने करत आहेत, डॉक्टर संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील स्थिती पाहता आपण भारतीय आहोत याचा मनोमन अभिमान वाटून जातो.

पोलिस, डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र शांतिदुत, आरोग्यदूत म्हणून काम करत आहेत. त्यांना आपण घरी थांबून सहकार्य करतोय. शासन, प्रशासनही लोकांना वेळोवेळी सूचना करतंय, घरी थांबण्याचे आवाहन करतंय.

आपले पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हे सुद्धा वेळोवेळी जनतेला विनंती करत आहेत, त्याला आपण प्रतिसाद देणे गरजेचे आहे. आपण या संकटावर नक्की मात करू,पण थोडा धीर धरावा लागेल एवढं मात्र नक्की….

!! हौसला और घोसला मत छोडीए,
सब सही हो जायेगा !!