जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी

 टीम महाराष्ट्र देशा : अष्टपैलू अभिनेते अशी ओळख असलेले निळू फुले यांचा आज पुण्यतिथी. त्यांच्या आवाजाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक छाप सोडली असे निळू फुले. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ या लोकनाट्यातून पहिल्यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहीजे’ या नाटकातून त्यांच्या ‘रोंगे’ या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या नाटकांंतून त्यांना प्रसिध्दीे मिळाली.

निळू फुलेंनी ‘विजय तेंडूलकर’, ‘सखाराम बाइंडर’, ‘जंगली कबुतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ अशी त्यांची नाटके रंगभूमीवर गाजली. तर ‘सामना’, ‘सोबती’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भूजंन’, ‘पिंजरा’, ‘जैत रे जैत’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केलं आहे. २००९ चा ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. निळु फुले यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होता. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी इ. पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

निळू फुले यांनी  मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातही आपलं योगदान दिलं आहे. ‘जरासी जिंदगी,’ ‘रामनगरी,’ ‘नागीन-२,’ ‘मोहरे,’ ‘सारांश,’ ‘मशाल,’ ‘सूत्रधार,’ वो सात दिन,’ ‘नरम गरम,’ ‘जखमी शेर,’ ‘कुली’ आदी चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली.

निळू फुले यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अन्ननलिकेच्या कर्करोगाने १३ जुलै २००९ रोजी पुण्यात निधन झाले आणि चित्रपट सृष्टीत कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली.