बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना कर्जे देऊ -राजन पाटील

सोलापूर : शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये कर्जे देण्यासाठी राज्य सहकारी (शिखर) बँकेने ६७ कोटी रुपये मंजूर केले. त्याची रक्कम अद्याप आलीच नाही. तरीही बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना कर्जे देऊ, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. शेतकरी कर्जमाफी निर्णयानंतर तातडीने कर्ज म्हणून १० हजार रुपये देण्याचा विषय जिल्हा बँकेत गाजला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अनेक वेळा संचालकांना सुनावले होते. शिखर बँकेच्या प्रशासकीय समितीवर सदस्य म्हणून अविनाश महागांवकर यांची निवड झाली. त्यानंतर लगेच जिल्हा बँकेला ६७ कोटी रुपये मंजूर झाले. ही रक्कम मिळाली तरी बँकेतील रोखता आणि सरलता या दोन्ही बाबींचा समतोल साधण्यासाठी अधिक रकमेची मागणी झाली. श्री. महागांवकर यांनी त्याचीही दखल घेत ५० लाख रुपये अतिरिक्त दिले. परंतु या रकमा मिळाल्याच नाहीत, असे श्री. पाटील म्हणाले. शिखर बँकेच्या कर्जातून शेतकऱ्यांना कर्जे देणे तोट्याचेच आहे. तरीही नुकसान सहन करण्याची तयारी दर्शवली. परंतु रक्कमच मिळाली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना वंचितही ठेवता येणार नाही. याचा विचार करून बँकेच्या निधीतून १० हजार रुपये देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला. सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांना ही कर्जे मिळतील, असे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.