‘आपण आपल्या स्टाईलमध्ये जगतो…’ ; पवारांच्या गाडीच्या सारथ्यावर उदयनराजेंची दिलखुलास उत्तरं

सातारा: नेहमी आपल्या हटके आणि बिनधास्त स्टाईल मुळे चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं.एवढचं नव्हे तर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यासोबत सातारा ते पुणे एकत्र प्रवास केला.या प्रवासादरम्यान शरद पवार आणि आपल्यात काय चर्चा झाली याचे दिलखुलास उत्तरं खुद्द उदयनराजेंनी दिली आहेत.

शरद पवार आणि आपल्यात काय चर्चा हे सांगताना उदयनराजे म्हणाले, “आमची पवारसाहेबांच्या गाडीबद्दल चर्चा सुरु होती. पवार साहेबांची पूर्वीची लँड क्रूझर गाडी भारी होती. सध्याची गाडी तितकीशी कम्फर्टेबल नाही. मात्र त्यांच्या गाडीचा नंबर तोच आहे, तीन तिऱ्ऱ्या, अर्थात 333, आणि आपल्या गाडीचा सत्ता ( 7) दोन्हीही भारी आहे. मी त्यांना विचारलं तीन तिऱ्ऱ्या का, पण ते म्हणाले, काय माहित नाही”

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईल उत्तर दिल ते म्हणले “कुणी कोणाला थांबवलं मला माहित नाही, मी कुणाला थांबवत नाही, मी फक्त मलाच थांबवू शकतो, कारण माझ्या गाडीचे ब्रेक माझ्या हातात आहेत, मी माझीच गाडी थांबवू शकतो, दुसऱ्याची नाही, कारण दुसऱ्याचे ब्रेक माझ्या हातात नाही”

दरम्यान, मध्यंतरी उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षांतर्गत तक्रारी शरद पवार यांच्याकडे करण्यात आल्याची चर्चा होती पण या सगळ्या चर्चा राजेंनी फेटाळल्या आहेत. “कोणी कुणाची तक्रार केली हे आपल्याला माहित नाही. ज्यांनी केली असेल त्यांना विचारा, पवारसाहेबांनी मला विचारलं असतं, तर मी सांगितलं असतं. आपण स्टाईलमध्ये जगतो, आपण इंटरनॅशनल लेव्हलची माणसं आहोत, हायटेक गोष्टी करतो, याने तक्रार केली, त्याने तक्रार केली, याकडे लक्ष देत नाही”