तारीख पे तारीख! औरंगाबाद मनपा निवडणूक सुनावणीसाठी पुन्हा मिळाली ‘ही’ तारीख!

औरंगाबाद : गेल्या दिड वर्षांपासून औरंगाबाद मनपा निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. निवडणूकीबाबत वारंवार ट्विस्ट येत आहेत. शपथपत्र दाखल न झाल्यामुळे मनपा निवडणूकीवर अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी औरंगाबाद महापालिका निवडणूकीसंदर्भात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिलेली आहे. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाच्या नियोजित तारखांमध्ये या खटल्याच्या सुनावणीची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यानुसार १ जुलै रोजी यावर सुनावणी अपेक्षित आहे.

राज्य सरकार, साखर आयुक्त आणि औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांना दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती, ती प्रबंधकांनी नामंजूर केली आहे. चार आठवड्यातच संबंधितांचे शपथपत्र दाखल करावे, अन्यथा आहे त्या स्थितीत याचिका सुनावणीसाठी खंडपीठासमोर ठेवण्याची कार्यवाही करावी, असे प्रबंधकांनी आदेशात बजावले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी केलेली वॉर्ड रचना आणि जाहीर केलेले वॉर्डांचे आरक्षण यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे प्रकरण २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांसमोर आले. याचिकेत दाखल न झालेल्या शपथपत्रांची दखल घेत प्रबंधकांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.

राज्य सरकार, साखर आयुक्त व प्रतिवादी क्रमांक औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक याचिकेच्या संदर्भात आपले शपथपत्र अद्याप सर्वोच्च न्यायालयात सादर केलेेले नाही. त्यामुळे प्रबंधकांनी या तिन्ही प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी यापूर्वीच्या तारखेपर्यंतचीच शेवटची संधी होती, त्यांनी या वेळेत शपथपत्र दाखल केले नाही.

शपथपत्र दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकचा वेळ मिळावी अशी विनंती केली होती, ही विनंती प्रबंधकांनी नामंजूर केली आहे. १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पालिकेच्या विधी अधिकारी तथा मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी ही तारीख मिळाल्याची माहिती सोमवारी (दि.३) दिली.

महत्त्वाच्या बातम्या