भरतबुवा रामदासी यांना संत दासगणु महाराज पुरस्कार

बीड (प्रतिनिधी) –  प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांना साईचैतन्य परिवार, विश्रांतवाडी, पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा श्री संत दासगणु महाराज पुरस्कार जाहिर झाला असून मान्यवरांच्या हस्ते 18 मार्च रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पुणे शहरात हा प्रदान करण्यात येणार आहे.

कीर्तन क्षेत्रात प्रभावी कार्य केलेल्या कीर्तनकारालाच हा पुरस्कार दिला जातो. ह.भ.प. भरतबुवांनी आतापर्यंत कीर्तन क्षेत्रात प्रचंड कार्य केले आहे. चाळीस वर्षात त्यांनी महाराष्ट्रात व बृहन्महाराष्ट्रात जवळपास अकरा हजार कीर्तने केली आहेत. सुशिक्षित युवक वर्गात कीर्तन परंपरेची आवड निर्माण व्हावी, परंपरेचे जतन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक शहरातून कीर्तन प्रशिक्षण शिबीरें घेतली व अनेक विद्यार्थी तयार केले.

bharat buva ramdasi

ह.भ.प. भरतबुवा रामदासी याचं कार्य आणि पुरस्कार –

  • महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात जाऊन, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, पाणी आडवा पाणी जिरवा, ग्राम स्वच्छता,व्यसनमुक्ती ,जातीयता निर्मूलन आदी विषयांवर चटई कीर्तनाचा अभिनव प्रयोग राबवला .
  • मुंबई, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, धारूर, सिल्लोड,बीड, अंबाजोगाई अशा अनेक शहरातून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून कीर्तन चळवळ उभी केली.
  • भरतबुवांना आतापर्यंत कीर्तनरत्न,कीर्तनभूषण, हिंदुधर्मभूषण, सेवा गौरव, अध्यात्मरत्न,राष्ट्रीय कीर्तनकार, संत ज्ञानोबा तुकाराम, गाडगेबाबा कीर्तनाचार्य, चंपावती रत्न, धर्मकार्यगौरव, समाजभूषण,आदि पुरस्कांनी गौरविण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आचार्य किशोरजी व्यास, शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मा.नितीनजी गडकरी,प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा.राम शेवाळकर,पंडित ह्रदयनाथ मंगेशकर अशा कितीतरी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.