‘दिया तले अंधेरा, समझ जाये तो बेहतर है!’, स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारला धारेवर धरले. कोरोनाची तिसरी लाट येणारच आहे, अशा परिस्थितीत सरकारने आतापासूनच तयारी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नाही तर कोरोना संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मागणीही राहुल यांनी केली. सरकारला योग्य मार्ग दाखवण्यासाठीच आपण श्वेतपत्रिकेची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना खोचक शब्दांमध्ये सुनावलं आहे. ट्वीट करत इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. ‘ग्यानी बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्ञान देत असताना त्यांनी काही गोष्टींवर आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट कुठून सुरू झाली? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. कोणत्या राज्यामध्ये देशात सर्वाधित करोना रुग्ण आणि करोना बळी आहेत? काँग्रेस शासित राज्यांमध्ये. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्य – काँग्रेसशासित राज्य. काँग्रेस शासित राज्यांमध्येच सर्वाधिक प्रमाणात लसीकरणाविरोधात आवाज उठत असून त्यामुळे लस घेण्यात टाळाटाळ केली जात आहे”, असा दावा स्मृती इराणी यांनी केला.

या ट्वीटमध्ये त्यांनी खोचक टोला देखील लगावला आहे. “कहावत है, दिया तले अंधेरा. समझ जाये, तो बेहतर है”, असं या ट्वीटमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू
देशातील संशोधकांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यासंदर्भात सरकारला इशारा दिला होता. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल यांनी केला. दुसऱ्या लाटेत सरकार अपयशी ठरले. दुसऱ्या लाटेत ज्यांना वाचवता आले असते, त्यांना वाचवता आले नाही. दुसऱ्या लाटेतील मृत्यूपैकी ९० टक्के मृत्यू हे सुविधा नसल्यामुळे झाले आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला, तर कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. देशात सर्वच ठिकाणी बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने उपाय केले नाही. आता देशात तिसरी आणि नंतर चौथी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने आधीच सर्व तयारी करायला हवी, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या