सत्ता गेल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यापुढे ‘अंधार’: महापौर मुक्ता टिळक

pune mayour mukta tilak

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उद्या (१५ मार्च) रोजी महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून ‘एक वर्ष अंधकाराच’ मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र दहा वर्षे सत्ता असताना काही करता आले नसलेल्या राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानेच त्यांच्या नेत्यांच्या डोळ्यापुढे अंधार आला असल्याचा खोचक टोला महापौर मुक्ता टिळक यांनी लगावला आहे. तसेच डोळ्यापुढे आलेल्या अंधारामुळेच ‘एक वर्ष अंधकाराच’ मोर्चा काढला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या सत्ता स्थापनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभराच्या कामाचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुक्ता टिळक बोलत होत्या.

महापालिकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरली मोहोळ तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. याला १५मार्च म्हणजेच उद्या एक वर्ष पूर्ण होत आहेत. मागील वर्षभरात पुणेकर जनतेच्या दृष्टीने अनेक योजना मार्गी लावण्यात आल्याचा दावा सत्ताधारी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामध्ये शिवसुष्टी, मेट्रो, २४ तास पाणी पुरवठा योजना, नदी सुधार प्रकल्पाचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपने सत्तेवर आल्यापासून केवळ पुणेकरांची निराशा केली असून एकही प्रकल्प मार्गी लागला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून लाल महाल ते महापालिका भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे.Loading…
Loading...