‘दरेकर काहीच चुकीचे बोलले नाही, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

‘दरेकर काहीच चुकीचे बोलले नाही, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिरुर इथे एका कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुके घेणार पक्ष’ असं वक्तव्य केलं होतं. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुणे पोलीस प्रशासनावर टीका केली आहे. ‘पुणे पोलिसांनी दरेकरांचे भाषण पूर्ण न ऐकताच गुन्हा दाखल केला. ओढूनताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे’ या शब्दांत वाघ यांनी निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रसे हा प्रस्थापित आणि साखरसम्राटांचा पक्ष आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असे दरेकर म्हटले होते. पण ते काही चुकीचे बोलले नाही. रंगलेले गाल हे बाईचेच का वाटावे? ज्या गोष्टीला काही शेंडा नाही, बुडखा नाही. त्याचा फक्त बागुलबुवा करून ठेवलेला आहे. पुणेकरांची मराठी चांगली आहे. मग त्यांनी वाक्याचे अनर्थ का काढावे?’ असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

तसेच प्रवीण दरेकरांच्या भाषणामध्ये बाईचा ‘ब’ सुद्धा नाही. सुरेखा पुणेकरांचा तर उल्लेख पण त्यांनी केला नव्हता. पुणे पोलिसांनी दरेकरांचे भाषण पूर्ण न ऐकताच गुन्हा दाखल केला. अत्याचाराच्या इतक्या घटना होतात. मग त्याकडे लक्ष का दिले जात नाही? ओढून ताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे. दुसरे काहीही नाही, असे म्हणत चित्रा वाघ यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य काय होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. १६ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा प्रवेश झाला. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या