fbpx

‘मुळशी पॅटर्न’चा खतरनाक टीजर प्रदर्शित

पुणे : अभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीजर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ च्या पहिल्या टीजर मध्ये चित्रपटाचा आशय मांडला आहे. या टीजरला नेटकऱ्यानी डोक्यावर घेतले आहे, तर या दुसऱ्या टीजर मधून चित्रपटातील काही व्यक्तिरेखांची ओळख झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याचा आजपर्यंत कधीही न बघितलेला असा अतिशय हटके लुक बघायला मिळतो.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टांकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा ‘मुळशी पॅटर्न’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ची गीते ‘देऊळ बंद’ ची हळवी गाणी लिहिणारे गीतकार प्रणित कुलकर्णी यांची असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे, तर छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.

अतिशय धारदार, भारदस्त संवादातून लक्ष वेधून घेणाऱ्या या टीजर मध्ये विविध गटांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करतानाच गुन्हेगारी बद्दल काही सांगू पाहणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नक्क्की काय दडले आहे? हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.

1 Comment

Click here to post a comment