‘तज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्व्हेक्षण करून पुनर्वसन करावे’

ramdas aathavle

महाड : दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील गावांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळून मनुष्यहानी होत आहे. राज्यात दरड कोसळून अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत. तळये गावात तर दरड कोसळून एकाचवेळी 40 हुन अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. अत्यंत दुःखद घटना आहे.घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ञाच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे.

नवीन गावे वसवावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. महाड येथील दरड कोसळलेल्या तळये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रामदास आठवलेंनी ही मागणी केली. या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

तळईतील दरड दुर्घटनेवेळी 41 लोकानी घराबाहेर पडून रस्त्याच्या दिशेने धाव घेऊन आपला जीव वाचविला तर अन्य लोक दरडीखाली दबले गेले. घटनास्थळी 8 फुटांचा ढिगाऱ्याचा थर आहे. त्यात अद्याप 33 लोक दबले आहेत. आज 7 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र मृतदेहांचे अवयव बाहेरतुटून निघत असल्याने मृतदेह बाहेर काढणे थांबवून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्याने त्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याची सूचना रामदास आठवले यांनी केलो.

तळये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्याचे होईल त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून देण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. महाड शहरात ही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक घरांचे तसेच व्यापारी दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.ज्या दुकानदारांकडे विमा नाही त्यानाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या