‘नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका’ ; प्रसाद लाड यांनी व्यक्त केली भीती

‘नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका’ ; प्रसाद लाड यांनी व्यक्त केली भीती

prasad lad and rane

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कालपासून नारायण राणेंविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच तक्रारींच्या अनुषंगाने नारायण राणेंवर कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत यावेळी आमदार प्रसाद लाड व नारायण राणे यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत होती. परंतु आता अटकेनंतर प्रसाद लाड महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. राणे सध्या आतमध्ये असून त्यांच्यापर्यंत कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्यामुळे, नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आणि भाजपा नेते डॉ. संजय कुटे यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. दरम्यान, प्रसाद लाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओत नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांसोबत तेथील कार्यकर्त्यांनी बाचाबाची झाल्याचे दिसून येते. नारायण राणेंच्या हातात जेवणाचे ताटही दिसून येत आहे.

नारायण राणे हे त्यांच्या गाडीतूनच पोलिसांसोबत गेले. रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या ड्रायव्हरलाही गाडीतून उतरवलं होतं. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र उच्च न्यायालयाने देखील राणे यांना दणका दिला आहे. हायकोर्टाने जामीन फेटाळला असून तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या