कोल्हापूर जिल्ह्याला धोक्याचा इशारा, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा आला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच कोयना आणि कृष्णा नद्याही दुथडी भरून वाहत आहेत.धरणक्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने मध्यरात्री ३ वाजता धरणाचे सर्व ७ स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील ४ राज्य मार्ग तर १८ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान कोयना धरणातून ४१ हजार ८८८ क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही. राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडेच आहेत. धरणातून ८५४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पंचगंगेची पाणीपातळी ३८ फुट ५ इंच एवढी झाली आहे. तसेच कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, कल्याणमध्येही काल रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.