‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.पुढे बोलताना त्यांनी शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासाठी मध्यस्थी केली असल्याचाही आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. तर बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल करण्यात आली. राज्य सरकारने उगारलेल्या छडीची नको, तर घुंगरांची छमछम व्हावी, यासाठी डान्सबार चालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, दोन वर्षांपूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारने कायदे इतके कडक केले आहेत, की आम्हाला डान्स बारचा परवानाच मिळू दिला नाही, असा आरोप डान्स बार चालकांनी केला होता. या कायद्यामुळे महिलांचं शोषण आणि इतर गैरप्रकार रोखले जात आहेत, असा दावा सरकारने केला होता. सुप्रीम कोर्टाने डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने काही ‘संस्कारी’ अटी आणि शर्थी घातल्या होत्या.