नृत्य शिरोमणी गुरूवर्य मीरा पाऊसकर यांचे निधन!

औरंगाबाद: नृत्य शिरोमणी गुरूवर्य मीरा पाऊसकर (वय ८१ वर्ष) यांचे शुक्रवारी (दि.१४) औरंगाबाद येथे निधन झाले. माता निर्मलादेवी नृत्यझंकार नृत्यसंगीत अकादमीच्या माध्यमातून त्यांनी औरंगाबादमध्ये भरतनाट्यम नृत्यशिक्षणाची सुरवात केली. त्यांनी कर्नाटकातील धारवाड आणि हुबळी येथे समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. १९७७ मध्ये त्यांनी मराठवाड्यात नृत्यझंकारच्या माध्यमातून भरतनाट्यम, कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यशैलीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.

भरतनाट्यमचे प्रशिक्षण देताना प्रयाग संगीत समिती अलाहाबाद, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागड, गांधर्व महाविद्यालय अशा संस्थांशी संलग्नीकरण करुन घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा मिळाला. त्यांच्याकडे हजारोंच्या संख्येने मुलींनी शास्त्रशुद्ध भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आणि शंभराहून अधिक विद्यार्थिनींनी आरंगेत्रम सादर केले.

सिंगापूर, पॅरीस, बेल्जियम, मोराक्को, मंगोलिया, चीन, जर्मनी, अमेरीका या ठिकाणी परदेशात आणि देशातील मोठ्या शहरात, कला उत्सवांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यांच्या मुंबई दुरदर्शन, नॅशनल डीडी भारती या वाहिन्यांवर नृत्यझंकारच्या मुलींनी नृत्याविष्कार सादर केला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व मुलगी आहेत. त्यांना आत्तापर्यंत आंध्रप्रदेशातील इंडियन डान्स अॅकॅडमीच्यावतीने नृत्य शिरोमणी पुरस्कार, लायन्स क्लबकडून बेस्ट टिचर द्रोणाचार्य पुरस्कार, श्रीझंकार मालिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

IMP