राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु !

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता विरोधकांनी यावरून सरकारला जबाबदार धरून चांगलच रान पेटवल आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. डान्सबारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली.

आबांनी डान्सबार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. परंतु या डान्सबार बंदीबाबत सरकारला न्यायालयात भक्कम बाजु मांडता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली असे फौजिया खान यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यात महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे. डान्सबारच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, फौजिया खान आदी मंडळींनी शनिवारी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.