fbpx

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे दुःखद निधन, उद्या चैत्यभूमी येथे होणार अंत्यसंस्कार

टीम महाराष्ट्र देशा : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. 17 जुलैला दुपारी 12 च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत.

राजा ढाले यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर खासकरून दलित पँथर चे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील ढाले यांच्या निधनाचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे.

दरम्यान आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये राजा ढाले यांची गणना होत होती. तसेच ते उत्तम लेखक देखील होते. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.