दलित मराठा वाद पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा कट उधळून लावा – रामदास आठवले

रामदास आठवले

मुंबई  : भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आंबेडकरी जनतेवर भिमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा दलित मराठा वाद पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. दलित मराठा दोन्ही समाज छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत. एकमेकांशी लढून ताकद वाया घालवू नका.

या दोन्ही समाजाने शांतता आणि संयम पाळून दलित मराठा संघर्षाचा कट उधळून लावावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. उद्या बुधवार 3 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत सर्व पोलीस ठाण्यावर भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली आहे.

आज 2 जानेवारी रोजीही रिपाइंतर्फे सर्व मुंबई ठाणे येथे स्वयंस्फुर्तपणे बंद पुकारण्यात आला. घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको करण्यात आला. चेंबूर पी एल लोखंडे मार्ग घाटकोपर पश्चिम विक्रोळी टागोरनगर कांजूरमार्ग पूर्व पश्चिम येथे बंद पुकारण्यात आला. अनेक ठिकाणी ट्राफिक जॅममध्ये लोक अडकले. दुकाने बंद करण्याचे आवाहन रिपाइं कार्यकर्ते सर्वत्र मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून करीत होते. तसेच मीरा भाईंदर येथे रिपाइंचे देवेंद्र शेलेकर डोंबिवली येथे अंकुश गायकवाड कल्याणमध्ये प्रल्हाद जाधव आदींच्या नेतृत्वात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.

अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्या रिपाइं कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. भिमा-कोरेगावच्या हल्ल्याच्या आडून दलित मराठा वाद पेटविण्याचा कट रिपाइं उधळून लावेल. या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे हल्लेखोरांना शोधून काढा त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी रिपाइं सोनवणे यांनी केली आहे.