सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घरपोच मिळणार.

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये आणि नागरिकांनी घरातच बसून राहावे यासाठी सांगली महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. आता सांगली महापालिका नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घरपोच देणार आहे. यासाठी मनपा क्षेत्रात वॉर्ड सनियंत्रण समितीची रचना करण्यात आली असून उद्या २६ मार्चपासून सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.

मनपा क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मनपा क्षेत्रात सुरू केलेले तात्पुरते भाजी विक्री केंद्र आणि अन्य भाजी मंडई आणि सर्व शॉपिंग मॉल सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार बैठकीत दिली.

याबाबत बोलताना आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, या वॉर्ड सनियंत्रण समितीमध्ये मनपाचा समन्वयक अधिकारी, स्थानिक सर्व नगरसेवक, चार कर्मचारी आणि प्रत्येक समितीसोबत एक पोलीस कर्मचारी असणार आहे. याचबरोबर ही समिती २० वॉर्डासाठी स्वतंत्ररित्या काम करणार आहे. यामध्ये कमिटीमार्फत नागरिकांना अन्नधान्य , भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डाचा वितरण आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये वॉर्डमधील वितरकाचे संपर्क नंबर प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या संपर्क नंबरवर नागरिकांनी फोन करून आपल्याला काय हवं आहे याची माहिती दिली तर त्या नागरिकाला घरपोच सर्व साहित्य आणि वस्तू पोहच केल्या जाणार आहेत. याचबरोबर डी मार्ट सांगली आणि मिरज, दांडेकर मॉल सांगली आणि विश्रामबाग, रिलायन्स मार्ट सुद्धा बंद करण्यात आले असून त्यांच्याकडून फक्त होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गरजेच्या वस्तूसाठी मनपाकडून जाहीर करण्यात आलेल्या विक्रेत्याशी संपर्क साधून आपल्याला ज्या वस्तू , साहित्य, भाजीपाला लागणार आहे याबाबत माहिती द्यावे त्यांच्याकडून आपल्याला घरपोच साहित्य दिले जाईल असेही मनपा आयुक्त मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

या घरपोच सेवा उपक्रमामुळे नागरिकांची शहरातही खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता येणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.