यंदा दहीहंडी साजरी करणारच ! ; मनसेने घेतला आक्रमक पवित्रा

raj thackrey

मुंबई : कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी सण, उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही दसरा, दिवाळीसारखे सणही अत्यंत साधेपणाने साजरे करावे लागणार का अशी परिस्थती आजही कायम आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

यावेळी मनसेनं कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. कारण मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं अभिजित पानसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यात त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचंही नाव नमूद केलं आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. मनसेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला.

तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP