पहा दगडूशेठ बाप्पाचं विलोभनीय रूप

दगडूशेठ

पुणे:- गणेशोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता आरती झाल्यानंतर मानाच्या असलेल्या दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली या उत्सवात आलेल्या प्रत्येकामध्ये गणरायाच्या नव्या आभूषणांची चर्चा रंगली. गणरायाचे हे विलोभणीय रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांनी भर पाऊसात प्रचंड गर्दी केली होती.

कसा आहे बाप्पाचा थाट:
यंदा गणपती बप्पाला ४० किलो सोन्याचे अलंकार तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षात ट्रस्टकडे जमा झालेल्या सोन्यापासून हे दागिने घडविण्यात आले आहे. यामध्ये नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह ७ ते १० हजार खड्यांची सजावट असलेला ९.५ किलोचा मुकुट, रत्नजडित खडयांनी नटविलेला ७०० ग्रॅमचा शुंडहार, सुर्यांच्या किरणांचा आभास निर्माण करणारे २ किलोचे कान आणि तब्बल ४ हजार सुवर्णटिकल्यांनी मिणाकाम करुन चंद्रकोराची आभास निर्मिती करणारा २.५ किलोचा अंगरखा बाप्पाला तयार करण्यात आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त श्री ब्रह्मणस्पती मंदिर साकारण्यात आले आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7.00 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या ब्राह्मणस्पती मंदिराचा आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा हे वैशिष्टय असणार आहे.

डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.त्याआधारे गणेशाची त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी अनेक आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. तर, हत्ती, मोर, गाय अशा विविध प्राण्यांच्या शिल्पांनी मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांच्यावर रेखाटण्यात आलेली ब्राह्मणस्पती आणि गणेश यंत्र हे खास आकर्षण असणार आहे. तब्बल एक लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. तसेच अत्याधुनिक लाईटस् विद्युतरोषणाईकरिता लावण्यात आले आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.