दत्तनामाच्या जयघोषात दगडूशेठ दत्तमंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

pune dagdusheth ganpati gurupornima celebration
पुणे :  दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… गुरुदेव दत्त की जय… च्या जयघोषाने बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. श्री दत्त महाराजांच्या मूर्तीसह संपूर्ण गाभा-याला केलेली फुलांची आकर्षक आरास पाहण्याकरीता भाविकांनी अलोट गर्दी केली. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित माध्यान आरतीला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, त्यांच्या पत्नी पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली (उगले), ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई,  विश्वस्त अ‍ॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार यांसह कर्मचारी आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
सकाळी ६ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. उत्सवाचे यंदा द्वादश दशकपूर्ती (१२० वे) वर्ष आहे. सकाळी ६.३० वाजता उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र आणि अध्यक्ष अंकुश काकडे व कुटुंबियांच्या हस्ते दत्तयाग झाला. तर, खासदार अनिल शिरोळे व माधुरी शिरोळे, आमदार जगदीश मुळीक व मेघा मुळीक, राजेश सांकला व रंजना सांकला या मान्यवरांच्या हस्ते सायं आरती करण्यात आली. मंदिरासमोरील उत्सव मंडपामध्ये स्वहस्ते अभिषेकाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामध्ये भाविकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन-कीर्तन सप्ताहात विविध भजनी मंडळे आणि संस्थांनी सहभाग घेतला.
ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे म्हणाले, गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने दरवर्षी गुरुमहात्म्य पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट, विश्वास नांगरे पाटील आणि डॉ. रणजीत जगताप यांना प्रदान करण्यात येईल. यंदा पुरस्काराचे १६ वे वर्ष आहे. दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवार, दिनांक २ डिसेंबर रोजी लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५ हजार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.