दाभोलकरांचे मारेकरी ५२ महिन्यानंतरही मोकाट, अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची शहरातील ओंकारेश्वर पुलाजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येनंतर ५२ महिने उलटूनही पोलीस, सीबीआय आणि तपास यंत्रणा मारेकऱ्यांना पकडण्यासाठी चाचपडत आहे. मारेकऱ्यांना पकडण्यात यावे, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ओंकारेश्वर पूलाजवळ ‘जवाब दो’ आंदोलन केले.

दर महिन्याला दाभोलकरांचा खून झालेल्या ठिकाणी ओंकारेश्वर पूलाजवळ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येते. आजही अनिंसच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही दाभोलकर’ म्हणत शांततामय आंदोलन केले. अंनिसचे कार्यकर्ते म्हणाले, की न्यायालयाने दाभोलकर खून प्रकरणाच्या सीबीआय तपासाबाबत अनेक वेळा ताशेरे ओढूनसुद्धा आरोपींना पकडण्यात आले नाही. सशंयित सारंग आकोलकर, विनय पवार हे अजुनही फरार आहेत.

खून तपासाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले. तरीही आरोपी मोकाट असल्याने विचारवंतावर टांगती तलवार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत दाभोलकरांचा विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान दाभोलकर खूनप्रकरणाबाबत नागपूर शहरात अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही आंदोलन केले आहे. या आंदोलनात त्यांनी सरकारची इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा आरोप केला आहे.

You might also like
Comments
Loading...