डॉ.दाभोळकर हत्या प्रकरण : पुनाळेकरांचा लॅपटॉप जप्त,सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

टीम महाराष्ट्र देशा; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे न्यायालयाने ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान,संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना या आधी शिवाजीनगर न्यायालयाने १ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज या दोघांच्याही कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.