कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा हस्तक राव अटकेत

d-k-rao-arrested-by-mumbai-crime-branch

मुंबई : खंडणीप्रकरणी कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याला आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याचवेळी बांधकाम व्यावसायाशी संबंधित व्यक्तीला धमकावून खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार कलम ३८७, ५०४, ५०४(२) व अन्य कलमांप्रमाणे राव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान राव याने बांधकाम व्यावसायिकास धमकावून त्याच्याकडून खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दिलीप सावेत, सहा. पोलीस आयुक्त पद्माकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबईच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे प्रबारी पोनि विनय घोरपडे, पोनि सुधाकर देशमुख, सपोनि विक्रम चव्हाण, सपोनि विजय ढमाळ, सपोनि जगदीश राऊत व पथक यांनी केली.