सायरस मिस्त्रींकडून टाटाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी आज टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांवरील पदांचा राजीनामा दिलाय. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मिस्त्री यांनी टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, इंडिया हॉटेल्स, टाटा मोटर्ससह सहा कंपन्यांमध्ये आपला राजीनामा पाठवलाय.

24 ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं. टाटा समुहातील अन्य कंपन्या मिस्त्री यांच्याविरोधात निर्णय जाहीर करणार होत्या. त्यासाठी उद्या या कंपन्यांची तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच मिस्त्री यांनी आपला राजीनामा दिलाय.

मिस्त्री म्हणाले, “मला वाटले ही अशी वेळ आहे की ज्यावेळी टाटा समुहाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. माझ्या बरखास्तीनंतर टाटा समुहात काहीच होणार नाही. त्यामुळे मी स्वत:ला जनरल मिटिंगमधून दूर करतो. मी ही लढाई मोठ्या स्तरावर जाऊन लढणार आहे.” आयएचसीएलच्या अहवालानुसार टाटा समुहामध्ये मिस्त्रींचे 1 लाख 28 हजार 625 शेअर्स आहेत.

आयएचसीएलच्या २०१५-१६ च्या अहवालानुसार कंपनीत मिस्त्री यांचे १, २८, ६२५ भाग आहेत. टाटा स्टीलमध्ये टाटा सन्सचा २९.७५ टक्के हिस्सा आहे. तर सर्व प्रमोटर्स आणि प्रमोटर्स समूहाची ३१.३५ टक्के इतकी भागीदारी आहे. नॉन प्रमोटर भागधारक एलआयसीकडे १३.६२ टक्के हिस्सा आहे.

टाटा मोटर्समध्ये टाटा सन्सचा २६.५१ टक्के इतका हिस्सा आहे. तर सर्व प्रमोटर्स आणि प्रमोटर्स समूहाची भागीदारी ३३ टक्के इतकी आहे. एलआयसीचा हिस्सा हा ५.११ इतके आहे. मिस्त्री यांचा वैयक्तिकरित्या यात १४,५०० भाग आहेत. दुसरीकडे टाटा केमिकल्समध्ये टाटा सन्सचा हिस्सा १९.३५ टक्के इतका आहे. सर्व प्रमोटर्स आणि प्रमोटर्स समूहाचा हिस्सा ३०.८० टक्के इतका आहे. एलआयसीचा यामध्ये ३.३३ टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांचे कंपनीत १६ हजार शेअर्स आहेत.