CRPF जवानानेच केली होती ‘त्या’ पुतळ्याची विटंबना

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद देशभर उमटताना पहायला मिळाले होते.तामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती . हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर समाजातील अनेक स्तरांवरून टीका झाली होती. परंतु, आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी नव्हे तर सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सेंथिल कुमार या जवानाने केली होती. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.

या जवानाला पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेंथिल कुमार पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून पेरियार यांच्या पुतळ्याच्या डोके तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर सेंथिल कुमारने पुतळ्याचे डोके जवळच्या चौकात फेकून दिल्याचेही सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले आहे. पोलीस चौकशीदरम्यान सेंथिल कुमारनेही आपण दारूच्या नशेत पुतळ्याची तोडफोड केल्याची कबुली दिली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आल्याचेही CRPF कडून सांगण्यात आले.