“अनुपम खेर तेव्हा…” ; काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा खोचक टोला

मुंबई : गुरुवारी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकासह दोघांची हत्या केली. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे आतापर्यंत घाटीत आठवडाभरात आठ जणांची हत्या झाली आहे. गुरुवारी कुलगाम भागात एका हल्लेखोराने हिंदू बँकेच्या व्यवस्थापकावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अनुपम खेर यांना चांगला टोला लगावाला आहे.

“आज कलम ३७० काढून टाकले, तरीही काश्मीर हिंदूची तीच अवस्था का? काश्मीर फाईल्सचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजप नेते देखील शांत का?”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

“काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होते आहे. तेव्हाही भाजपच्या पाठिंब्याचे सरकार होते, आजही केंद्रात भाजपचे सरकार आहे. फरक एवढाच आहे की, अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते,” असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.

संजय राऊत यांची टीका-

शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारला जाब विचारला आहे. काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. काश्मीरमध्ये १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हिंदूंना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे – मनसे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. “ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत. ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच ते चालविण्याचे प्रशिक्षण दिल पाहिजे,” असे संदीप देशपांडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :