मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या घरातून पोलिसांनी पैसे मोजायची मशीन जप्त केली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले पैसे याच मशीनद्वारे मोजल्याचा संशय असून त्यांनी संपकाळात खरेदी केलेल्या मालमत्तांचीही पोलीस चौकशी केली जाणार आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुणरत्न सदावर्ते त्यांच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडले आहे. अनेक जिल्ह्यांत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की, सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस. टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी डयुटीवर रुजू झाले आहेत. सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्तेच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. सदावर्ते व त्याच्या माफिया टोळीने एस. टी. कामगारांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले. कामगारांना देशोधडीस लावून स्वतःचे खिसे भरणारे सदावर्तेसारखे पुढारी म्हणजे माणुसकीचे शत्रूच आहेत. आता पोलिसांनी सदावर्तेच्या घरातून पैसे मोजण्याची मशीन जप्त केली आहे. पैसे मोजण्याची मशीन घरात ठेवावी असा कोणता धंदा या महाशयांनी सुरू केला होता? वकिलीतून इतका पैसा मिळावा की, ते मोजायला यंत्र लागावे? एस.टी. कामगारांना उल्लू बनवून जमा केलेल्या पैशांची मोजदाद करायला ही मशीन सदावर्तेकडे होती. सदावर्तेने संपकाळात काही मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या. सदावर्ते ज्या परळ भागातील इमारतीत राहत होता ती जागादेखील संशयास्पद व्यवहारातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सदावर्ते व त्याची बायको हे इमारतीमधील इतर अधिकृत रहिवाशांना सतत धमक्या देत होते. कोणी प्रतिवाद केला तर ‘ऍट्रॉसिटी’ गुन्ह्यांत अडकवू अशी भीती दाखवत होते. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 DC vs PBKS : पंजाब किंग्जचा फुसका बार..! दिल्लीनं सहज जिंकला सामना; वॉर्नरची हॅट्ट्रिक!
- पोलार्डतात्या निवृत्त..! IPL 2022 दरम्यान घेतला ‘धक्कादायक’ निर्णय; वाचा!
- IPL 2022 DC vs PBKS : दिल्लीच्या फिरकीत अडकली पंजाब किंग्ज ; ११५ धावांवर गुंडाळलं!
- ‘या’ तारखेला गंगुबाई काठियावाडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार!
- “नवरात्र, गणेशोत्सवात मुस्लिमांनाही त्रास, पण त्यांची कधीच तक्रार नाही..”- रामदास आठवले