मुंबई: गुवाहाटीमधील जवळपास १५ महाराष्ट्रद्रोही आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काय तर म्हणे, गुवाहाटीतील काही गद्दारांच्या महाराष्ट्रातील कार्यालयांची तोडफोड झाली. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेचा गहन वगैरे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो म्हणून केंद्र सरकारने त्यातील १५ जणांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये सरळ सरळ हस्तक्षेप असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
अर्थात, केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांच्या एकाधिकारशाहीचा हा काही पहिलाच नमुना नाही. महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, दिल्ली आदी बिगरभाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रातील भाजपा सरकार या प्रकारचे हस्तक्षेप नेहमीच करीत आले आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाची सरकारे नाहीत, त्यांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारांनी अधिक्षेप करायचा, त्यांना घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
महाराष्ट्रासारखे छत्रपती शिवरायांचा वारसा चालविणारे स्वाभिमानी राज्यही केंद्राच्या या मोगलाईतून सुटलेले नाही. आताही महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्या १५ गद्दार आमदारांना थेट ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय याच मोगलाईचा भाग आहे. मुळात, या सर्वांनी पक्षाशी, राज्याशी, त्यांना निवडून दिलेल्या मतदारांशी प्रतारणा केली आहे. तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांना दिलेली सुरक्षा काढून घेतलेली नाही. हे गद्दार बेइमान झाले असले तरी राज्य सरकारने आपला धर्म सोडलेला नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा राज्य सरकारने काढली होSS… असे ‘हवाबाण’ दोन दिवसांपूर्वी हवेत सोडण्यात आले होते खरे, पण राज्याच्या गृहमंत्र्यांनीच त्यातील हवा काढून घेत ते बाण मोडून तोडून टाकले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था काढलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. वास्तविक, राज्य सरकारने असा काही निर्णय घेतला जरी असता तरी ती सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणता आली नसती, मात्र राज्य सरकारने आपली नैतिकता आणि इमान सोडले नाही, दुष्टपणा केला नाही. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून राज्यातील ‘नाचे’…”, संजय राऊतांचा प्रहार
- Nilesh Rane : “उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव…”, निलेश राणेंचा खोचक टोला
- Nikhil Wagle: एकनाथ शिंदेंची भाषा ‘भाजप’ची, फडणवीस किती काळ लपणार तुम्ही?; निखील वागळे यांचा टोला
- Eknath Shinde : “…यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल”, एकनाथ शिंदेंचा ट्वीट करत बंडखोरीमागील खुलासा
- Nilesh Rane : “…त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे”, ‘त्या’ वक्तव्यावरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना सुनावले
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<