fbpx

पंकजाताई फक्त भाषणच सुंदर करतात : नीलम गोऱ्हे

टीम महाराष्ट्र देशा- अत्याचाराच्या घटनेत पीडितांना योजनांचा लाभ तत्काळ मिळणे आवश्यक आहे. मनोधैर्य योजनेतील मदतीची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढविली पाहिजे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी पीडितेला तत्काळ रोख स्वरूपात मदत या योजनेतून उपलब्ध झाली पाहिजे. या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे, वेळखाऊ प्रक्रिया पाहता महिला बालविकास विभागाची संकुचित वृत्ती दिसून येत असल्याचे सांगत, पंकजाताई फक्त भाषणच सुंदर करतात, योजनेची अंमलबजावणीही तशीच सुंदर झाली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉक्टर नीलम गोर्हे यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

नगर शहरात बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती. गोऱ्हे यांनी त्या पीडित मुलीची रुग्णालयांमध्ये जाऊन विचारपूस केली. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित डॉक्टरांकडून त्या मुलीची विचारपूस केली. डॉक्टरांनी सध्याच्या उपचाराबद्दलची माहिती दिली. त्यानंतर शिवायलात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पीडित मुलीचे मनोधैर्य वाढवून तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेतून मदत उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग व येथील जिल्हाधिकार्यांकडे मी पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.