मुंबई : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी राज ठाकरे यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,‘हनुमान चालीसा किंवा धार्मिक गोष्टींचा वापर केवळ आणि केवळ राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे आणि त्यासंदर्भामध्ये कुठे तरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एका बाजूला एमआयएम आहे आणि एका बाजूला राज ठाकरे म्हणून मला एका वाक्याची आठवण येते की, एका बाजूला नागनाथ आहे आणि एका बाजूला सापनाथ आहे’, असे गोऱ्हे म्हणाल्या.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल- संदीप देशपांडे
- “आक्रमकता ही कृतीतून…”, संदीप देशपांडे यांचा शिवसेनेला जोरदार टोला
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील…”; मनसेचा जोरदार टोला
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जामीन अर्ज फेटाळला!
- “अशा सुपारी सभा महाराष्ट्राने…”, राज ठाकरेंच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका