‘राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करणे ही केवळ स्टंटबाजी’

टीम महाराष्ट्र देशा : वाई पंचायत समितीच्या निधी वाटपाच्या मुद्दावरून ऋतुजा शिंदे या चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील वाई पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतले आहेत. यावर पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनीताई भोसले व उपसभापती अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका केली आहे.

ऋतुजा शिंदे ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील वाई पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर नाहक चिखलफेक करत आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या कारभारात कोणत्याही सदस्यावर अन्याय केला जात नाही. यापूर्वी परखंदी गावातील विकासकामांसाठी ऋतुजा शिंदे यांना सेस फंडातून अनेकदा निधी देण्यात आला. आधी दिलेला निधी ऋतुजा शिंदे यांनी खर्च करून दाखवावा, मगच बिनबुडाचे आरोप करावेत. सेस फंडाच्या मामुली मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर आरोप करणे, हा ऋतुजा शिंदे यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रात म्हंटले आहे की, सेस फंडातून निधी वाटप करताना कॉंग्रेसच्या सदस्यांना जाणीवपूर्वक डावलले जाते, म्हणून सर्वसाधारण सभेतून सभात्याग करण्याचा स्टंट आणि राजकीय वलय नसलेले पती विराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीवर मोर्चा काढून ऋतुजा शिंदे यांनी स्वतःचे हसे करून घेतले होते. ऋतुजा शिंदे यांनी पतीच्या सांगण्यावरून पंचायत समितीच्या कारभारावर शिंतोडे उडवू नयेत. सेस फंडातून परखंदीतील बौद्ध वस्तीतील समाजमंदिराची दुरुस्ती झाली.गावातील भैरवनाथ मंदिर परिसर सुधारण्यासाठी लाखोंचा निधी दिला, मात्र, तुम्ही कामात बदल केल्याने ते पूर्ण न होता निधी पडून आहे. आधीचा निधी वापरल्याशिवाय त्या सदस्याला पुन्हा निधी देऊ नये, हा सभागृहाचा निर्णय आहे. नवीन निधी येताच ऋतुजा शिंदे यांना देण्यात येणार आहे.