भाजपा अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर चिदंबरम यांची टीका

p chidambaram

मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.रविवारी दुपारी गुजरात भाजपा नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला १०३ आमदार उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाची मुख्यमंत्री पदी घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, बैठकीत सगळ्यात मागे बसलेले,पहिल्यांदाच आमदार झालेले भुपेंद्र पटेल यांची अनेपेक्षित रित्या मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आता कॉंग्रेसने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पाच वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या विजय रूपाणी यांना अचानक हटवल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

भाजपा केवळ आपल्या अयशस्वी मुख्यमंत्र्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांची यादी भाजपा शासित राज्यांमध्ये मोठी आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रुपाणी यांना हटवल्याबद्दल आणि त्यांच्या जागी पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रिपदी बसवल्याबद्दल ट्विट केले आहे. भाजप आपल्या अपयशी मुख्यमंत्र्यांना हटवण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री नीट काम करत नाहीत हे भाजपाला कधी कळेल? असे चिदंबरम यांनी म्हटले.

भाजपने चांगले काम न केल्यामुळे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत आणि इतर अनेक राज्ये आहेत जिथे अपयशी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना बदलण्याची गरज आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. “संबंधित राज्यातील लोकांना माहीत होते की बीएस येडियुरप्पा, दोन रावत आणि रूपाणी कित्येक महिने खराब कामगिरी करत होते. आणखी बरेच आहेत जे बदलले पाहिजेत. यादी लांबलचक आहे ज्यात हरियाणा, गोवा, त्रिपुरा इ.,” असे चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :