सिन्नर सेक्स रॅकेट : दोघे ताब्यात

sex racket

नाशिक:- बांगलादेशातून महिलांची मानवी तस्करी आणि सिन्नर येथील सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे.असिफ फारूक शेख (वय 26 रा चौक, मंडई भद्रकाली), सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (21 , रा भीमवाडी, गंजमाळ नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. काल रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात दाखल केल्यावर २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.हे दोघेही दलाल असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या ५ झाली आहे. एकूण ७ जणांवर गुन्हे दाखल असून या पैकी पीडित बांग्लादेशी मुलीची मावशी माजेदा आणि आणखी एक दलाल यांचा कसून शोध पोलिस घेत असून लवकरच त्यांना पकडले जाण्याची शक्यता आहे.पोलिस प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले असून याच्या तपासासाठी ३ पथके नियुक्त केली आहे. तसेच या प्रकरणी पीडितेने सिन्नर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांच्या कार्यप्रणालीचा बुरखा फाडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनही गंभीर दखल घेतली असून कोणत्याही क्षणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवरून वर्तविण्यात येत आहे.