‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील महिला पोलीस बनली खरोखरची गुन्हेगार

POOJA JADHAV CRIME PETROL arrested in fake rape case

‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत पोलिसाची भूमिका करणारी पूजा जाधव हिला एका ‘क्राईम’ प्रकरणात अटक करण्यात आली आहे.  पूजा हि स्वतःवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करायला भोसरी पोलिसात गेली होती. मात्र , तिचा बनाव उघड झाल्याने आता पोलिसांनी तिलाच अटक केली आहे

पूजा जाधव ही आणखीन पाच  साथीदारांसह श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून फसवण्याच काम करत असल्याच आता समोर आल आहे. पूजा जाधव (२४) ही माया भास्कर सावंत (५०) रवींद्र मोतीराम सिरसाम (५६) यांच्यासह अन्य तिघांच्या मदतीने श्रीमंत व्यक्तीला आपल्या जाळ्यात फसवायची. काही दिवसांपूर्वी पूजाने अशाच एका धनाढ्य व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवले, त्याच्याशी लगट केले आणि नंतर त्या व्यक्तीला बलात्काराच्या आरोपाची धमकी देऊन पैसे उकळायला सुरुवात केली. ही व्यक्ती ठेकेदार असेल असा तिचा अंदाज होता, त्याच्याकडून अधिक पैसे उकळता येतील या हेतूनेच पूजाने त्याच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती.

पैसे घेऊन देखील पूजा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी सतत देत होती. आर्थिक तडजोड झाल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्याला जाळ्यात ओढायचे असेच ते करत आले होते. यासंदर्भात याआधीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांनी सुरु केला होता. मात्र अडीच वर्षांपूर्वी भोसरी परिसरात अशाच पद्धतीने एका इंजिनियरला जाळ्यात अडकवत, पूजा आणि तिच्या साथीदारांनी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले होते. तेव्हा त्यांना यश आले होते, मात्र त्यांचे दुर्दैव्य इतकेच की तेव्हा प्रकरण हाताळणारे भोसरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनीच भोसरी पोलीस स्टेशनमध्ये आताचे प्रकरण हाताळले आणि या सर्वांचे बिंग फोडले गेले.

या प्रकरणी ८ जुलै रोजी पूजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पूजाने ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत महिला पोलिसाची भूमिका केली असून ती आता चार महिन्याची गरोदर आहे. पोलिसांच्या विशेष कारवाईचे चित्रीकरण या मालिकेतून केले जाते आणि येथूनच तिला ही संकल्पना सुचल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भोसरी पोलिसांनी पूजा सह आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.