भाड्याने ट्रॅक्टर घेवून परस्पर विक्री करणारी टोळी गजाआड

टीम महाराष्ट्र देशा – ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने भाड्याने ट्रॅक्टर घेऊन त्याची परस्पर विक्री करणारी टोळी गजाआड केली आहे. या टोळीचा म्होरक्या शहर पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा पुत्र असून तो आरटीओ कार्यालयात एजंट म्हणूनही काम करत होता. शेख अन्वर शेख मुसा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने या गोरखधंद्यातून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी अन्वर आणि देविलाल राजपुत या दोघांना अटक केलेली आहे. त्यात अनेक आरोपींचा हात असल्याचे समोर येत असून गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीत आरोपींना ताब्यात घेत आहेत. त्यामुळे आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या टोळीने बोगस कागपत्र बनवून अनेक ट्रॅक्टर विकले असून त्यांना या कामात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. शेख अन्वर हा आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करतो त्याने दोन वर्षापूर्वी कन्नड येथील एका शेतकर्‍याचे ट्रक्टर जळगावला हस्तांतरित केले होते. त्या ट्रॅक्टरवर विमा कंपनीचे कर्ज असतांना अन्वरने अधिकार्‍यांशी हातमिळवणी करुन तो ट्रॅक्टर क्रमांक बदलून हस्तांतरित केला आणि तेव्हापासून त्याने ट्रॅक्टर विक्री करून अनेकांना गंडविण्याचा गोरखधंदाच सुरू केला.

You might also like
Comments
Loading...