दुचाकीवरील भामट्यांचा सोनसाखळी चोरीचा प्रयत्न असफल

नाशिक  : नाशिक शहर परिसरांत गत काही वर्षापासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. पोलीसांच्या नाकावर टिच्चुन महिलांच्या सौभाग्याचा लेण्याची भरदिवसा लुट होत असतांना आज आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 81 वर्षीय आजोबांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेण्याचा प्रयत्न दुचाकी वरील दोघा अज्ञातांनी केला. मात्र चाणाक्ष आजोबांनी मोठ्या धैर्याने या भामट्यांचा प्रतिकार करीत त्यांचे मनसुबे उधळून लावले. दरम्यान या घटनेमूळे महिलाबरोबरच पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज देखील असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे.

विश्वनाथ शंकरराव घुगे(वय.81 रा.विश्वकमल बंगला, स्वामी नारायण नगर, नविन आडगांव नाका) याच आजोबांनी आज त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकाविण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांना पळून जाण्यास भाग पाडले. आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास विश्वनाथ घुगे यांना श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने घराखाली रिक्षाची वाट बघत उभे होते. दरम्यान यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकी वरील दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या जवळून दोन चक्कर मारल्या. नंतर दुचाकी वरील दोघे भामटे त्यांच्या जवळ येवून उभे राहीले व आम्ही फायनान्स कंपनीत काम करतो याठिकाणी शिंदे नामक व्यक्तीचे घर कुठे आहे. आम्ही खूप वेळा पासून शिंदे यांचे घर शोधत आहे मात्र सापडत नसल्याचे सांगीतले. यावेळी 81 वर्षीय विश्वनाथ घुगे यांनी त्यांना थोडे पुढेच शिंदे यांचे घर असल्याची माहिती दिली.

यावेळी पुन्हा भामट्यांनी हा बंगला कुणाचा आहे अशी विचारणा केली असता घुगे यांनी मान वळवत हा बंगला माझाच असल्याचे सांगीतले. याच संधीचा फायदा घेत दुचाकी वरील दोघा भामट्यांनी घुगे यांच्या गळ्यातील सुमारे 7 तोळे वजनाची सोन्याची चैन खेचून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजोबांच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट हेरली. त्यांनी त्वरीत एका हाताने दुचाकीचे मागील कॅरियर पकडले तर दुसर्‍या हातात त्यांच्या काठी होती त्याकाठीने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खाली पडली. दुसरीकडे दुचाकीवरील भामट्यांनी आजोबांचा विरोध लक्षात घेता गाडी रेस करीत धूम ठोकली. यावेळी विश्वनाथ घुगे खाली पडल्याने त्यांच्या छातीस व गुडघ्यास मुका मारला.

दरम्यान घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह आडगांव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी परिसरांची पाहणी करून संशयीत दुचाकीस्वारांचे वर्णन घुगे यांच्याकडून जाणून घेतले. दरम्यान या प्रकरणी विश्वनाथ घुगे यांनी आडगांव पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही.