पुढे दंगल सुरू असल्याचं सांगून बार्शीत वृद्धेस लुटलं

crime

सोलापूर: देवदर्शन उरकून घराकडे पायी जाणा-या वृद्धेस पुढे दंगल सुरू असल्याचे खोटे सांगून हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या हातचलाखीने काढून एक लाख रूपये किंमतीचा ऐवज फसवणूक केल्याचा प्रकार भगवंत मंदिरासमोरील कथले सभागृहासमोर घडला.

तारामती मुकुंद शहाणे (वय 75, रा. नवी चाटी गल्ली, मुरलीधर मंदिराशेजारी, बार्शी) असे फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव आहे. शहाणे यांनी बार्शी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या सकाळी नेहमीप्रमाणे 11.30 वाजण्याच्या सुमारास भगवंत मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन करून त्या दुपारी पायी घराकडे जात असताना कथले सभागृहासमोर एक 35 ते 40 वर्ष वयाच्या महिलेने शहाणे यांना येऊन मी तुमच्या घरातील सर्वांना ओळखते.पुढे दंगल सुरू आहे. तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी हातातील चार बांगड्या काढून त्या रूमालात ठेवत असताना संबंधित महिलेने आपल्या हातचलाखीने प्रत्येकी सव्वा तोळ्याच्या चार बांगड्या काढून घेऊन रूमालात प्लास्टीकच्या दोन बांगड्या ठेऊन निघून गेली.वृद्ध महिला शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरूद्ध खोटे बोलून हातातील चार सोन्याच्या बांगड्या फसवणूक करून नेऊन एक लाख रूपयाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.