रेमडेसिवीर चोरी प्रकरणी मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

औरंगाबाद : महापालिकेच्या मेडिकल स्टोअर रुममधून तब्बल ४८ रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक बॉक्स गायब झाला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासनाने मुख्य फार्मसिस्ट बी.डी. रगडे व सहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांना निलंबित केले आहे. आता या दोघांविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात पालिकेचे औषधी भांडार नियंत्रक डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी रितसर तक्रार देखील दाखल केली आहे.

पालिकेच्या स्टोअर रुममधून २० एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शनचे २६ बॉक्स मेल्ट्रॉन कोविड सेंटरला पाठविण्यात आले. मेल्ट्रॉन मधील कर्मचाऱ्यांनी हे बॉक्स स्विकारले. २४ एप्रिल रोजी मेल्ट्रॉन येथील औषधनिर्माण अधिकारी संतोष कापुरे व पुजा कुलकर्णी यांनी शेवटचा २६ वा बॉक्स फोडला असता त्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी ७५ एमपीएस इंजेक्शन आढळून आले.

मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनी तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिले. त्यानंतर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चौकशीमध्ये स्टोअर रुममधून रेमडेसिवीरचा बॉक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे स्टोअमधील पाच कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून २४ तासात त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला. खुल्यास्याअंती या प्रकरणात मुख्य फार्मसिस्ट बी.डी. रगडे व सहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांना दोषी ठरवण्यात आले, त्यानुसार जिन्सी पोलिसांत मनपाने तक्रार दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या